हरिश्चंद्रगड मराठी ब्लॉग
हरिश्चंद्रगड, जितकं बोलावं जितकं लिहावं तेवढं कमीच पडेल इतका सुंदर मनमोह आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला असा हा गड आहे. कोंकणकडा, कोंकणकडा वरून दिसणार इंद्रध्वज, तारामती शिखर, तारामती शिखरावरून दिसणारा सह्याद्री आणि असं बरच काही. हरीश्चंद्रगड हा अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात उभा असणारा असा मोठा डोंगर आहे. आणि तारामती शिखर हे ह्या जिल्यातील सर्वात उंच शिखर आहे.
हरिश्चंद्रगडाचा इतिहास हा खरंच वाखाणण्याजोगा आहे आणि म्हणूनच गडप्रेमींना ह्या गडाबद्दल नेहमी कुतूहल वाटत आलं आहे कारण ह्याचा इतिहास आणि भूगोल खरंच विस्मकारक आहे.
हरिश्चंद्रगडाचा इतिहास
बाकी बऱ्याच किल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा आदिवासी समाजाकडे होता परंतु नंतर मराठा आणि मुघल ह्यांच्या इतिहासाची सुद्धा नोंद ह्या किल्यावर होते. ह्या किल्याची नोंद मत्स्यपुराण आणि अग्निपुराण ह्यात केली आहे असा देखील काही स्थानिकांचा म्हणणं आहे. आदिवासी कोळी समाजाकडून हा गड मुघलांनी स्वतःच्या ताब्यात घेतला या नंतर सुमारे १७४७ च्या काळात मराठ्यांनी मुघलांकडून हा गड जिंकून स्वतःच्या ताब्यात घेतला. कृष्णाजी शिंदे हे त्यावेळेचे किल्लेदार होते.
हरिश्चंद्रगडावर कसे पोहोचाल.
हरिश्चंद्रगड हा खूप मोठा असल्याकारणाने पूर्ण पाहण्यासाठी १-२ दिवस वेळ काढूनच जावे. इथे जाण्यासाठी वाटा देखील अनेक आहेत.
१. खिरेश्वर मार्गे
पुणे जिल्ह्यातून खिरेश्वर मार्गे जाणारी वाट सहज सोप्पी असल्याने बरेचसे गिर्यारोही ह्याच मार्गाने जातात. मुंबई जुन्नर असा हा रस्ता माळशेज घाटातून जातो, खुबी फाट्यापर्यंत आपल्याला जावे लागते. पुण्यमार्गे गेल्यास आळेफाटा वरून आणि कल्याण वरून मुरबाड-माळशेज मार्गे गेल्यास खुबी फाट्यापर्यंत जाता येते. खिरेश्वर गाव हे खुबी फाट्यावरून ५ किमी अंतरावर आहे त्या साठी धरणावरून चालत जावे लागते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावात एक जुने शिवमंदिर आहे, हे मंदिर अकराव्या शतकातील आहे असे सांगतात. मंदिराबाहेरील सभामंडप खूप छान बनवला आहे, आतील गाभाऱ्यातील दरवाज्यावर शेषयायी विष्णू आणि त्यांच्या परिवाराचे खूप सुंदर असे कोरीव शिल्प बनवले आहे आणि अश्या अनेक कोरीव प्रतिमा म्हणजे नरवाहन कुबेरकुबेरी, मकारवाहन मकररती, मूषकवाहन गणेशगणेशानी तिथल्या पाषाणावर आढळून येतात. ह्याच गावातून दोन वाटा गडावर जातात. एक म्हणजे टोलारखिंडीतुन, इथून गडावर पोचण्यासाठी सुमारे ३ तास लागतात. तर दुसरी वाट हि राजदरवाज्यावर घेऊन जाते, हि वाट आधी खूप प्रसिद्ध(प्रचलित) होती, सध्याच्या काळात जाणार असाल तर वाटाड्या सोबत जावे. सोबत पाणी घेऊन जाण्यास विसरू नये.
२. पाचनई मार्गे
हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी सगळ्यात सोप्पी वाट म्हणजे पाचनई मार्गे जाणे. मुंबई नाशिक रस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. त्याठिकाणावरून मग राजूर या गावी जावे. राजूर वरून सुद्धा आपल्याला दोन मार्गानी गडावर जात येते. राजूर वरून पाचनई ह्या गावी जावे लागते, बस ने राजूर वरून पाचनई ला जाता येते. पाचनई हे हरिश्चन्द्रगडाचे सुरवातीचे स्थान आहे इथून गडावर जाण्यासाठी २. ३० ते ३.०० तास लागतात. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर सूमारे ४-५ किमी आहे.
३. नळीची वाट
नळीची वाट म्हणजे हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठीची सर्वात कठीण वाट. नळीच्या वाटेने जाण्यासाठी कोंकणकडच्या पायथ्याशी म्हणजेच बेलपाडा या गावात जावे लागते. रॉक क्लाइंबिंग येत असेल तरच ह्या मार्गाचा अवलंब करावा अन्यथा करू नये. ह्या वाटेने ट्रेक करण्यासाठी सुमारे १०-१२ तास लागतात.
हरिश्चंद्रगडावर आवर्जून पाहण्याची ठिकाणे
१. हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे ह्या गडावरच केंद्रबिंदू च आहे. ह्या मंदिराची साधारण उंची हि १५-१६ मीटर असावी. ह्या मंदिरासमोरच एक दगडी पूल आहे ज्या खालून नदी वाहते. हि नदी तारामती शिखरावरून च वाहत येते तेथील स्थानिक ह्याला मंगळगंगेचा उगम असा बोलतात. हीच नदी पुढे गावातून वाहत जाते. मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याच गुहा आहेत. त्यातल्या काही गुहांमध्ये पाणी आहे. हे पाणी फारच थंड असते त्या प्रमाणे त्याची चव सुद्धा खूप गोड आहे.
२. केदारेश्वराची गुहा
हरिश्चंद्रगडावर अजून एक दर्शन घेण्यासारखं स्थान म्हणजे केदारेश्वर गुहा.ह्या गुहेमध्ये एक मोठं शिवलिंग आहे. आणि हि गुहा चार स्तंभांवर उभी आहे, त्यातले तीन स्तंभ पडले असून एकच स्तंभ शाबूत आहे. अस म्हणतात कि हे चार स्तंभ म्हणजे चार युग, म्हणजेच सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग. तीन युग संपली आहेत म्हणून ते तीन स्तंभ पडले आहेत, चौथा स्तंभ पडेल तेव्हा कलयुग सुद्धा संपेल. ह्या गुहेमध्ये कंबरभर पाणी आहे, आणि हे पाणी फारच थंड असते.
३. कोंकणकडा
हरिश्चंद्रगडावरच सर्वात मोठं आकर्षण म्हणजे कोंकणकडा. जवळपास अर्धा किमी परीघ आणि अर्धगोलाकार असा हा कोंकणकडा. ह्याच संपूर्ण सौंदर्य ह्यच्या कडेला झोपूनच (आणि महत्वाचं म्हणजे सांभाळून) अनुभवलं जाऊ शकत. कड्याची उंची पायथ्यापासून साधारण ४५०० फूट आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच असा हा कोंकणकडा सर्वांचं मन मोहून घेतो. ह्याच कड्यावरून तुम्ही इंद्रध्वज सुद्धा पाहू शकता. निसर्गाचं सौंदर्य तुम्ही ह्या कड्यावरून पाहू शकता.
४. तारामती शिखर
तारामती शिखर हे ह्या गडावरील सर्वात उंच शिखर आहे, ह्याची उंची साधारण ४८०० ते ४९०० फूट आहे. ह्या शिखरामध्ये सात लेणी आहेत. त्यातील एक गुहेमध्ये गणपती बाप्पा ची सुंदर आणि भव्य अशी मूर्ती आहे ज्याची उंची साधारण ८ ते ८.५० फूट आहे. इथून पुढे गेल्यावर आपण तारामती शिखरावर जातो. तारामती शिखरावरून आपल्याला नाणेघाट, जीवधन, रतनगड, कळसुबाई, आजोबा पर्वत, हडसर, भैरवगड दिसतात. तारामतीच्या माथ्यावर २-३ शिवलिंग सुद्धा आहेत.
हरिश्चंद्रगडाबद्दल अजून माहिती
हरिश्चंद्रगड ट्रेकची पातळी - मध्यम
प्रदेश - माळशेज
शीर्षस्थानी जाण्यासाठी लागणार वेळ - खिरेश्वरच्या वाटे ४ तास, पाचनईच्या वाटे ३ तास, नळीची वाट मार्गे ८-१२ तास
कालावधी - 1 दिवस
हरिश्चंद्रगड उंची - सुमारे ४०००-४५०० फूट
जवळचे रेल्वे स्टेशन - कसारा
निष्कर्ष
हरिश्चंद्रगड ट्रेकिंग मराठी ब्लॉग मध्ये हरिश्चंद्रगडाबद्दल जेवढी शक्य होईल तेवढी माहिती देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे, आशा करतो कि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तुम्हाला काही कंमेंट किंवा अजून काही माहिती द्यायची असेल तर तुम्ही कंमेंटबॉक्स मध्ये लिहू शकता किंवा खाली दिलेल्या mail id वर आम्हाला कळवू शकता.
info.mechtrekk@gmail.com
0 comments: